Tuesday, July 12, 2016

चौथीच्या पुस्तकातला इतिहास.

एखाद्या देशाला इतिहास असावा तर मराठी चौथीच्या पुस्तकातल्यासारखा. नाहीतर मग नसावाच.

सौरभ चौथीत होता तेव्हा माझं खूप मोठ्ठ सौभाग्य म्हणून एक पूर्ण वर्ष मी घरी होते.

रायरेश्वराच्या मंदिरातील शपथ, त्यावेळी मावळ्यांची साथ, प्रतिपतचंद्रलेखेव ची मुद्रा सगळं सगळं वाचताना डोळ्यांनी अमृत प्यायल्यासारखं वाटायच. किती वेळा वाचलं असेल ते पुस्तकच जाणे.

कित्येक संवाद मी आणि सौरभ अगदी नाटकातल्यासारखे म्हणायचो. आमचा बेड म्हणजे एखाद्या गडाचा तट व्हायचा. जो काही आवेश असायचा आमचा कि बस रे बस.

बाजीप्रभूंचे संवाद तर अगदी त्वेषाने म्हणत असू. "एक बाजी गेला तर तुम्हाला अनेक बाजी मिळतील. पण देशाला शिवाजी महाराजांची गरज आहे." "बहादूर मर्दांनो, हुश्शार ! प्राण गेला तरी जागा सोडू नका. गनीमाला गड चढू देऊ नका." "महाराज गडावर पोचले. आता मी सुखाने मरतो."

दिलेरखान मुरारबाजीला म्हणतो "तुझ्यासारखा पराक्रमी पाहिला नाही. तू आमच्यात ये. अभय देतो" तेव्हाचा मुररबाजीचा संवाद तर हृदयात कोरलेला "अरे आम्ही शिवाजीमहाराजांची माणसे. तुझा कौल घेतो कि काय? तुझी जहागीर हवी कोणाला?"

आणि "आधी लगीन कोंढाण्याचे!" "आणि मग "गड आला पण सिह गेला" हे म्हणजे डबडबले डोळे आणि अभिमानाने भरलेला ऊर.

आणि व्यक्तिगतपणे माझा या इतिहासातील अत्यंत आवडता प्रसंग म्हणजे तानाजी धारातीर्थी पडल्यावर सुर्याजीने मावळे खचून पळून जाऊ नयेत म्हणून कापलेला दोर. सूर्याजी म्हणजे माझा अल्टिमेट हिरो. "अरे, तुमचा बाप इथे मारून पडला आहे. तुम्ही असे भागूबाई सारखे काय पळता? मागे फिरा. मी दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या मारून जीव द्या नाहीतर शत्रूशी युद्ध करा." असे ठणकावत त्याने आपल्या भावाच्या म्हणहेच तानाजीच्या बलिदानाचे चीज केले आणि गड घेतला.

असे जीवाला जीव देणारे मावळे आणि स्वराज्याची शपथ घेऊन श्रींचे राज्य घडवणारे शिवबा आणि त्यांना हे बाळकडू देणारी आई जिजाऊ आणि छत्रपतींना घडवणारे दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी सगळे एकसे एक !!!

या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाने मी आणि सौरभ खूप जवळ आलो एकमेकांच्या भावविश्वाच्या.

सौरभला मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्याचे समाधान तेव्हा मिळाले अगदी नक्की !!!

स्वाती

No comments:

Post a Comment