Thursday, July 7, 2016

कोहम

"कोहम..."

"दो चर्चगेट रिटर्न देना" असं म्हणून त्याने तिकीट काउंटर वरून २ तिकिटे घेतली. पैशांची देवाणघेवाण झाली आणि तो वळला. त्याचे बोट धरून उभ्या असलेल्या छोटूकलीला बरोबर घेऊन प्लाटफॉर्मनंबर १ च्या दिशेने जाऊ लागला.

अचानक त्याने तिचा हात सोडला. दोघेही एकमेकांकडे पाहून कसलातरी विचार करू लागले.

तो कमालीचा भेदरला.

छोटुकलीला ज्यूसचा एक स्टौल दिसला. तिने ताबडतोब तिकडे मोर्चा वळवला.

याच्या डोक्यात विचारांचे थैमान सुरु झाले.

"मी कुठे आहे?"

"कुठे आहे?" "नाही नाही..." "मुळात मी कोण आहे?"

त्याला दरदरून घाम फुटला. "मला स्मृतिभ्रंश झालाय का?"

"पण स्मृतिभ्रंश झालाय का हा प्रश्न मला पडतोय म्हणजे स्मृतिभ्रंश हा एक रोग आहे वगैरे हे तर आठवतय की मला. मग मला मी कोण आहे हेच का नाहीये आठवत? स्मृतिभ्रंश मध्ये अस होत का?"

त्याने पटापट आपल्याला काय काय आठवतंय यावर विचार सुरु केला.

"पाढे आठवतायत, शाळेत आपण शिकलो हे आठवतय. पण कोणत्या?
नाही आठवत. गणिते आठवतायत पण शिक्षक नाही आठवत. अनेक कविता आठवतायत.. पण कवींची नावे नाही आठवत.  क्रिकेट आठवतय. खेळाडूंची नावे नाही आठवत. देश अशी कन्सेप्ट असते हे आठवतय, पण देशांची नावे नाही आठवत. "

"आणि माझ्या देशाच नाव?????? नाही आठवत !."

"जात, धर्म, पंथ... अस असत सगळं.... पण माझं यातलं कोणतंय...
नाही आठवत."

भेदरला तो.  जबरदस्त घाम फुटला त्याला. तो आजूबाजूला पाहू लागला...

सगळे जण भेदरले होते. सगळ्यांनाच घाम फुटला होता.

प्रत्येक रस्त्यावर. प्रत्येक घरात...

प्रत्येक देशात !!!

एकच अवस्था...

कोहम !


- स्वाती छत्रे-मायदेव.
१ मार्च २०१५

No comments:

Post a Comment