Thursday, July 7, 2016

अनोळखी मुशाफिरा

"अनोळखी मुशाफिरा"

गाडीचा वेग आता वाढला होता. थंडी अधिकाधिक जोर धरत होती. बाळ तर अगोदरच रेशमी गोंडस पावलांपासून ते डोक्यावरील नुकत्याच उगवत असलेल्या सोनेरी मऊसर केसांपर्यंत पूर्णपणे लोकरीच्या कपड्यांमध्ये लपेटलेले होते. तरी देखील त्याला थंडीपासून अजून वाचवण्यासाठी चारूने आपल्या खांद्यावरची शाल काढून त्याच्या भोवती मायेचे अजून एक कवच गुंडाळलेच.

राजन त्याच्या Readers' Digest मधून बाहेर यायला अजून तयार नव्हता. शिवाय एकापाठोपाठ एक फोन्स चालू होते.

समोरच्या बर्थवरचा तरुण कधी पासून चारूच्या हालचाली टिपत होता. चारुची बाळावरची माया तो कुतूहलाने पाहत असलेले तिला स्पष्टपणे जाणवत होते. त्याच्या नजरेत तिला कमालीचा आपलेपणा आणि तिच्याबद्दलची काळजी जाणवत होती.

हा कोण कुठचा माणूस का बर माझ्याकडे बघतोय एवढा असे तिला अजिबात वाटले नाही. उलट त्याला आपले बाळावरचे प्रेम आवडलेय हे तिला कळत होते आणि त्यामुळे तिला एक प्रकारचे वेगळेच सुख मिळत होते.

राजनचे चारू आणि बाळापेक्षा  स्वत:त गुंतलेले असणे त्याला खूप त्रस्त करून जातेय हे देखील तिला जाणवत होते. असे एखाद्या परक्या तरुणाने आपल्या नवऱ्याचा राग करावा हे तिला खरेतर आवडत नव्हते पण तरी देखील आपल्याला कोणीतरी जाणतेय हि भावना तिला सुखावून गेली.

ट्रेन आता त्यांच्या उतरण्याच्या ठिकाणाला पोचायला काही मिनिटांचाच अवधी होता. राजनचा फोन खणाणला. त्याच्या बोलण्यावरून जाणवत होते कि त्याला त्याच्या कोणत्यातरी क्लायंटचा फोन आहे आणि राजन त्याला त्याच्या कंपनीचे प्रोडक्ट विकण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.

इथे गाडी स्टेशनला लागली होती. हळूहळू वेग कमी होत होता. उतरणारे सगळे प्रवासी सामान घेऊन उतरण्याची तयारी करू लागले. राजन देखील एकीकडे फोनवर बोलत बोलत सामान काढू लागला. एकच bag होती. ती त्याने घेतली. आणि तो सरळ गाडीच्या दरवाजापाशी जाऊन उभा राहिला. क्षणभर देखील त्याने बाळाकडे किवा चारूकडे पहिले नाही. गृहीत धरले होते तिला.

चारूने तिच्याकडची छोटी bag खांद्याला लावली. बाळाला घेऊन ती राजनच्या पाठून चालू लागली. मात्र ती bag आणि बाळ दोघांना घेऊन पुढे जाणे तिला नीट जमत नव्हते. "अरे राजू, जरा ही bag पकड न.." चारू राजनला हाक मारत सांगत होती. पण राजनने त्याचे फोन वरचे बोलणे चालूच ठेवले. उलट तिला खुणावून "एक मिनिट थांब गं.." असे सांगत होता.

गाडी थांबली. उतरणारे सर्व प्रवासी उतरले. राजन उतरला. फोन वर बोलत थोडा पुढे गेला. आता बहुतेक क्लायंटला प्रोडक्ट पटलेले होते आणि डील संदर्भात बोलणी सुरु होती.

गाडी सुरु होण्याअगोदर चारुला उतरणे आवश्यक होते. Bag आणि बाळ दोघांना सांभाळत दरवाज्याच्या दिशेने कूच करण्याचा आटोकाट प्रयत्न ती करत होती. तेवढ्यात समोरचा तरुण पुढे झाला. त्याने तिची bag हातात घेतली. तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला दरवाजापर्यंत आणले. आणि खाली उतरण्यास मदत केली.

तिच्या बरोबर तो देखील खाली उतरला. आपली शाल काढून तिच्या खांद्यावर गुंडाळली. त्याच्या नजरेत तिच्या बद्दलचा आदर आणि काळजीयुक्त माया पूर्णपणे जाणवत होती. तिचा हात आपल्या हातात घेऊन केवळ दोन शब्द तो म्हणाला.. "काळजी घे." आणि तो परत गाडीत चढला. गाडी सुरु झाली.

चारू जागीच स्तब्ध उभी राहून डोळ्यासमोरून नाहीशा होणार्या गाडीकडे पाहत राहिली.

तिच्या मनात चित्रपटातील दोनच ओळी रुंजी घालू लागल्या.

"कधीतरी, कुठेतरी फिरून भेटशील का..?
अनोळखी मुशाफिरा, वळून पाहशील का..??"


- स्वाती छत्रे-मायदेव.

No comments:

Post a Comment