Thursday, July 7, 2016

शेवाळं

शेवाळं


शेवाळ्याला म्हणतात सगळे
"श्शी ! गलिच्छ !!!"

मी मात्र त्याला म्हटलं,
"मला तुझं कौतुक वाटतं
बिकट परिस्थतीत
काही करून तग धरतं"


शेवाळं हसलं.
मला म्हणालं,

"मला देखील वाटतं गं
वृक्षासारखं उंच व्हावं.
उंच उंच आभाळात
पक्षासारखं विहरावं."

"पण मी तरी काय करणार
माझा कुठे इलाज असतो.
मात्र नशिबाला दोष देत
जगणं सोडायचं नसतं."

"आसवे ढाळून ढाळून
संपणार कधीच नसतात.
जेवढी ढाळू तेवढीच
जिद्दीने दाखल होतात."

"यावर एकच उपाय असतो
त्यांच्यातच रमायचं नसतं.
ओठांवर हासू आणत
आसवांना हटवायचं असतं."

शेवाळ्याचं म्हणणं ऐकून
माझं मलाच नवल वाटलं.
कारण त्याच्यामध्ये मला
माझंच वेडं मन दिसलं !

- स्वाती छत्रे-मायदेव
(७ ऑगस्ट २०१३ )

No comments:

Post a Comment