Sunday, February 10, 2013

काकबळी...

काकबळी...

आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीमध्ये एक कावळा नेहेमी काव काव करत असतो.. शिवाय एक खारुताई पण खिडकीत येत असते. म्हणून मी हल्ली रोज स्वयंपाकघराच्या खिडकीमध्ये पोळीचे तुकडे, ओल्या खोबर्याचे तुकडे, कधी शेंगदाणे ठेवते.. म्हणजे खार, उंदीर, कावळा कोणीतरी खाईल या हेतूने.. मी ठेवलेल्या तुकड्यामधील एखादा तुकडा पहिल्यांदा नाहीसा होतो आणि मग काही वेळाने बाकीचे तुकडे पण नाहीसे होतात... पण मला कळत नाही नक्की कोणी खाल्ले आहे ते.. म्हणून आज पोळीचे तुकडे ठेवून दुसर्या रूम मध्ये जाउन हळूच लक्ष ठेवायचे ठरवले. एक कावळा मी पोळी करत असताना नेहेमीप्रमाणे आजही आला होताच. कालच्या तुकड्यामधील एक-दोन तुकडे आज खिडकीत अजून शिल्लक होते, पण हा कावळा आला असल्याने मी ताज्या पोळीचे तुकडे परत ठेवले... आणि दुसर्या रूम मध्ये जाउन वाट पाहु लागले. पण बराच वेळ झाला तरीही कावळा खाईना. नुसताच बसून होता.. मग मी साधारणपणे ११:५५ ला एक चमचाभर वाफेभरला गरम गरम भात त्या पोळीच्या तुकड्यावर ठेवला आणि बाजूला झाले. थोड्याच वेळात कावळे महाराज खिडकीच्या दरवाजावरून उतरले आणि चोचीने मस्त पैकी तो भात खाउ लागले... मला प्रचंड आनंद झाला... पण आता पंचाईत म्हणजे मी रोज सकाळी फक्त पोळ्याच करते... पण आज मुलगा लवकर घरी येणार असल्याने भात केला होता, म्हणून मी भात ठेवू शकले आता उद्यापासून निदान या कावळे महाराजांसाठी तरी थोडा भात सकाळी करावा लागेल अस दिसतंय...