Thursday, July 14, 2016

पैशाची नाही... अजूनही प्रेमाची आहे दुनिया

पैशाची नाही... अजूनही प्रेमाची आहे दुनिया

रुपारेलला असताना आमच्या लेडीज रूमच्या जवळ कॅन्टीन होत तिथे बटाटावडा मिळायचा एकदम सॉलिड. तिथे पुष्कळदा वडा खाल्लाय.

वडे तळताना बेसनाचे काही थेंब गरम तेलात पडल्यावर ते तळून जो कुरकुरीत चुरा तयार होतो त्याकडे आम्हा मैत्रिणींची सतत नजर जायची. आम्ही त्या कॅन्टीनवाल्याला तगादा लावायचो कि आम्हाला तो चुरा दे थोडा म्हणून. सुरुवातीला एक दोन वेळा दिला त्याने पण नंतर मात्र तो अजिब्बात द्यायचा नाही.

"हे खाऊ नका ताई... घसा धरेल"

आज सौरभ सांगत होता कि आई अग काल मी आणि माझा मित्र रात्री उशिरा अभ्यास करून मग डोसेवाल्याकडे जाऊन डोसा खात होतो तेव्हा तिथे एक मुलगा आला होता.

 डोसेवल्याकडच पीठ संपलं होत. शेवटचा एक डोसा होणार होता. तो त्या डोसेवाल्याला स्वतः खायचा होता अस तो नुकताच म्हणाला होता. या मुलाने डोसा मागितल्यावर तो प्रथम नाहीये म्हणाला पण मग त्या मुलाच्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला "ठीक है शायद एक बन पायेगा । खाके जाना बेटा । "

असे अनुभव आले कि एवढं क्षणोक्षणी पैसा पैसा करणारी दुनिया अजून कशी चालली आहे या प्रश्नाचे उत्तर मिळते.


स्वाती छत्रे मायदेव

Tuesday, July 12, 2016

चेंज ऑफ व्हॉईस !!!

चेंज ऑफ व्हॉईस !!!

फ्रॉम ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह.

तुम्ही कधी कधी एखाद्या व्हरच्युअल वर्ल्ड (व्हाट्सऍप, फेसबुक, शॉपिंग साईट्स, गेम्स) मध्ये इतके गुंगून जाता कि रिअल वर्ल्ड मध्ये आपल्या आजूबाजूला कोण आहे, काय बोलतंय त्याच भान राहत नाही.

तुमच्या बरोबची व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगत असते. मग थोड्या वेळाने एखादा प्रश्न विचारते आणि तुम्ही आभासी दुनियेत गुंग. तुम्ही सवयीने "हो हो" किंवा "हा हा" म्हणता. पण तेव्हा तिथे खरतर काही उत्तर अपेक्षित असत.

मग तुमच्या बरोबरच्या व्यक्तीला कळून चुकतं कि इतका वेळ आपली चाललेली बडबड हि म्हणजे नेट कनेक्शन गेलं असताना केलेल्या कमेंट्स होत्या.

मग ती व्यक्ती तुम्हाला वैतागून परत तो प्रश्न मोठ्याने चिडून विचारते. तेव्हा मग तुमच्या रिअल वर्ल्ड wifi चा विक झालेला सिग्नल ब्लिंक होत होत ग्रीन होतो.

मग अचानक रिअल वर्ल्ड wifi सिग्नल मिळाल्यावर सगळे मेसेजेस टुंग टुंग किंवा टिंग टिंग करत तुमच्या मेंदूच्या सेल वर यायला लागतात. थोड्या वेळ तुम्ही हँग होता.

इथे ती व्यक्ती रागाने अँग्री इमॉटिकॉन झालेली असते.

मग तुम्ही वेळ मारुन न्यायला त्याच्या प्रश्नाचं उत्तर एकदम मोठ्या आवाजात द्यायला सुरु करता. हाच हाच तो ऍक्टिव्ह व्हॉईस. तुम्ही अचानक खूप ऍक्टिव्ह होऊन जाता. आणि मग समोरच्याच्या चेहरायावरचे भाव बघून तुम्हाला कळून चुकते कि आपलं थोडं "1g" च्या जोरावर high resolution विडिओ अपलोड करणं चाललंय.

मग तुमचं ऍक्टिव्ह व्हॉईस ने सुरु झालेलं वाक्य शेवटच्या शब्दावर येईपर्यंत पस्सिव्ह होऊन जात. इतकं पॅसिव्ह होत कि त्या high resolution विडिओ च रूपांतर चक्क एका plain smiley emoticon मध्ये होत.

होतो का तुमचा पण असा ऍक्टिव्ह व्हॉईस टू पस्सिव व्हॉईस मध्ये बदल ?

(अतिहुशार लोकांसाठी - हा ऍक्टिव्ह व्हॉईस आणि पस्सिव व्हॉईस इथे इंग्लिश ग्रामर च्या संदर्भात वापरलेला नसून केवळ आपल्या मुखातून येणाऱ्या व्हॉईस च्या टोन संदर्भात वापरला आहे याची नोंद घ्यावी)

- स्वाती छत्रे मायदेव

चौथीच्या पुस्तकातला इतिहास.

एखाद्या देशाला इतिहास असावा तर मराठी चौथीच्या पुस्तकातल्यासारखा. नाहीतर मग नसावाच.

सौरभ चौथीत होता तेव्हा माझं खूप मोठ्ठ सौभाग्य म्हणून एक पूर्ण वर्ष मी घरी होते.

रायरेश्वराच्या मंदिरातील शपथ, त्यावेळी मावळ्यांची साथ, प्रतिपतचंद्रलेखेव ची मुद्रा सगळं सगळं वाचताना डोळ्यांनी अमृत प्यायल्यासारखं वाटायच. किती वेळा वाचलं असेल ते पुस्तकच जाणे.

कित्येक संवाद मी आणि सौरभ अगदी नाटकातल्यासारखे म्हणायचो. आमचा बेड म्हणजे एखाद्या गडाचा तट व्हायचा. जो काही आवेश असायचा आमचा कि बस रे बस.

बाजीप्रभूंचे संवाद तर अगदी त्वेषाने म्हणत असू. "एक बाजी गेला तर तुम्हाला अनेक बाजी मिळतील. पण देशाला शिवाजी महाराजांची गरज आहे." "बहादूर मर्दांनो, हुश्शार ! प्राण गेला तरी जागा सोडू नका. गनीमाला गड चढू देऊ नका." "महाराज गडावर पोचले. आता मी सुखाने मरतो."

दिलेरखान मुरारबाजीला म्हणतो "तुझ्यासारखा पराक्रमी पाहिला नाही. तू आमच्यात ये. अभय देतो" तेव्हाचा मुररबाजीचा संवाद तर हृदयात कोरलेला "अरे आम्ही शिवाजीमहाराजांची माणसे. तुझा कौल घेतो कि काय? तुझी जहागीर हवी कोणाला?"

आणि "आधी लगीन कोंढाण्याचे!" "आणि मग "गड आला पण सिह गेला" हे म्हणजे डबडबले डोळे आणि अभिमानाने भरलेला ऊर.

आणि व्यक्तिगतपणे माझा या इतिहासातील अत्यंत आवडता प्रसंग म्हणजे तानाजी धारातीर्थी पडल्यावर सुर्याजीने मावळे खचून पळून जाऊ नयेत म्हणून कापलेला दोर. सूर्याजी म्हणजे माझा अल्टिमेट हिरो. "अरे, तुमचा बाप इथे मारून पडला आहे. तुम्ही असे भागूबाई सारखे काय पळता? मागे फिरा. मी दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या मारून जीव द्या नाहीतर शत्रूशी युद्ध करा." असे ठणकावत त्याने आपल्या भावाच्या म्हणहेच तानाजीच्या बलिदानाचे चीज केले आणि गड घेतला.

असे जीवाला जीव देणारे मावळे आणि स्वराज्याची शपथ घेऊन श्रींचे राज्य घडवणारे शिवबा आणि त्यांना हे बाळकडू देणारी आई जिजाऊ आणि छत्रपतींना घडवणारे दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी सगळे एकसे एक !!!

या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाने मी आणि सौरभ खूप जवळ आलो एकमेकांच्या भावविश्वाच्या.

सौरभला मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्याचे समाधान तेव्हा मिळाले अगदी नक्की !!!

स्वाती

Thursday, July 7, 2016

तुळशीचं पान.

तुळशीचं पान.

त्याच्या समोर तराजू !!!

एका पागडीत माझं प्रारब्ध.
त्यावर पापांच्या राशी... माझ्या !!!
त्यावर पत्रिकेतील रुसलेले ग्रह गोल.
त्यावर अजून काय काय काय !!!!

दुस-या पागडीत मग आहेच
थोडं-फार पुण्य... कमावलेलं !!!
त्यावर मग नवस-सायास.
त्यावर फारसं अजून काय असणार !!!

पण मग अचानक कुठूनशा आल्या
तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा !!!!!!!!!!
आणि मग अचानक...
झालं कि पारडं जड. पुण्याच... माझ्या !!!!

तुळशीच पान तुळशीच पान म्हणतात ते हेच, हेच, हेच !!!

स्वाती छत्रे-मायदेव २७ नोव्हेंबर २०१३

शेवाळं

शेवाळं


शेवाळ्याला म्हणतात सगळे
"श्शी ! गलिच्छ !!!"

मी मात्र त्याला म्हटलं,
"मला तुझं कौतुक वाटतं
बिकट परिस्थतीत
काही करून तग धरतं"


शेवाळं हसलं.
मला म्हणालं,

"मला देखील वाटतं गं
वृक्षासारखं उंच व्हावं.
उंच उंच आभाळात
पक्षासारखं विहरावं."

"पण मी तरी काय करणार
माझा कुठे इलाज असतो.
मात्र नशिबाला दोष देत
जगणं सोडायचं नसतं."

"आसवे ढाळून ढाळून
संपणार कधीच नसतात.
जेवढी ढाळू तेवढीच
जिद्दीने दाखल होतात."

"यावर एकच उपाय असतो
त्यांच्यातच रमायचं नसतं.
ओठांवर हासू आणत
आसवांना हटवायचं असतं."

शेवाळ्याचं म्हणणं ऐकून
माझं मलाच नवल वाटलं.
कारण त्याच्यामध्ये मला
माझंच वेडं मन दिसलं !

- स्वाती छत्रे-मायदेव
(७ ऑगस्ट २०१३ )

बालपणीचा काळ सुखाचा

मधेच कधीतरी वरच्या मजल्यावरून अचानक गॅस सिलिंडर (मुद्दाम) हलवल्याचा आवाज ऐकू येतो.. मग खालच्या मजल्यावरची "ती" वरच्या मजल्यावरच्या "ती" ला खूण म्हणून खुर्ची सरकावल्याचा आवाज करते. खुणेची निशाणी पटते.

मनात एक प्रकारचे थ्रील ओथंबबून भरते...

मग स्वयंपाकघरातील सिंक च्या बाजूच्या छोट्या खिडकीत खालच्या मजल्यावरील "ती" अत्यंत उत्कटतेने वाट बघत बसते. थोड्याच वेळेत त्या खिडकीत वरून एक गुड नाईट चा बॉक्स एका दोरीला बांधून खाली येतो. खालच्या मजल्यावरील "ती" तो बॉक्स पकडते व आत घेते. उघडते.

आत अत्यंत साधा टुकार मेसेज असतो एका चिट्ठीवर... "काय करतेयस ?" किवा तत्सम काही. पण तो मेसेज वाचणारीला आनंदाचे भरते आलेले असते. मग ती पण त्या चिट्ठीवर उत्तर लिहिते. "काही नाही.. सुहास शिरवळकरांच शायलक वाचतेय." मग परत एकदा खुर्ची सरकावल्याचा आवाज होतो. परत वरून  गॅस सिलिंडर हलवला जातो. आणि चिठ्ठ्यांचा सिलसिला चालू राहतो...

"संध्याकाळी गच्चीवर भेटूया न?"

"हो. चालेल."

"किती वाजता?"

"५ वाजता?"

"चालेल."
 "..."

"..."

"..."

अशा अनेक आठवणी ताज्या झाल्या जेव्हा वरच्या मजल्यावर राहणाऱ्या "शिवानी" ला भेटले...

*****************

किस्सा नंबर २ ...

"ए, भुते असतात का खरच?" वंदू म्हणाली...

"काय माहित?" इति: शिवानी...

बघूया का रात्री आपणच? - अस्मादिक...

मग ठरलं.. वंदू, शिवानी आणि स्वाती भेटणार रात्री बारा नंतर कॉलनीत खाली. पण १२ पर्यंत जागे कसे राहणार?

"आग, सुरीने जखम करून घेऊया हातावर... आणि त्यावर मीठ चोळून ठेवूया... म्हणजे झोप नाही येणार आणि १२ वाजले कि उतरू खाली..." वंदूचे भन्नाट डोके...

ठरलं.. आणाभाका झाल्या...

प्रत्यक्षात १२ वाजता सगळ्या भूतानी वाट पहिली पण तिघी जणी आपापल्या आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या होत्या... :D

*******

बालपणीचा काळ सुखाचा...

अत्यंत छोट्यात छोट्या गोष्टींमध्ये पण प्रचंड थ्रिल...

आनंद !!!!

अवर्णनीय !!!!

स्वर्गीय सुख

<3 p="">

सुख-दुःखाच्या वाट्या

सुख-दुःखाच्या वाट्या

मला दोन वाट्या मिळाल्या
एक मातीची, एक लोखंडाची
देवाने मनाचे दोन कप्पे केले
एक सुखाचा, एक दु:खाचा

सुखाच्या कप्प्यात मी लोखंडाची वाटी ठेवली
आणि दुःखाच्या कप्प्यात ठेवली मातीची
सुखाच्या पावसाने वाटी मस्त भरायची
दुःखाच्या पावसाचा निचरा व्हायचा

मग.. हळू हळू... परिस्थितीचे हातोडे पडले
सुखाच्या वाटीचा ठोकून ठोकून पातळ पत्रा झाला
दु:खाच्या वाटीचा मऊ भुसभुशीत चुरा झाला

मनाचं आता रिनोवेशन केलय
नव्या को-या वाट्या घेतल्या
आता सुखाच्या कप्प्यात मातीची
दुःखाच्या कप्प्यात लोखंडाची वाटी

आता येऊ देत दु:खाचा कितीही पाउस
जेवढ्या जोराने आदळेल तेवढ्याच जोराने परतेल
आणि सुखाच्या चार थेंबांचे शिडकावे पण मुरतील.. खोलवर.

स्वाती छत्रे-मायदेव
१ डिसेंबर २०१३

या गहिऱ्या डोळ्यांत माझ्या

या गहिऱ्या डोळ्यांत माझ्या , प्रीतीचा समुद्र जणू
मी निळाई , मी गहराई , हे आव्हान , तू पोहून घे

या गुलाबी ओठांत माझ्या , कुसुमातील शहद जणू
मी माधुरी , मी मदीरा , हि धिटाई , तू प्राशून घे

या रेशमी कायेस माझ्या , मोरपिसाचा स्पर्श जणू
मी दुलाई , मी रजाई , हि ऊब , तू लगटून घे

या कोमल हृदयात माझ्या , मायेचा निर्झर जणू
मी ममता , मी करुणा , हि बरसात , तू न्हाऊन घे

-स्वाती

मेडिकल ट्रान्स्क्रिपशनिस्टचे गाऱ्हाणे

हे बारा देशांच्या, बारा हॉस्पिटल्सच्या, बारा सिस्टम्सच्या, बारा सोफ्टवेअर्सच्या, बारा हार्डवेअर्सच्या, बारा सर्वर्सच्या आणि बारा एसिंच्या देवा म्हाराजा..... व्हय म्हाराजा.

देवा म्हाराजा, फोरीनच्या कंट्रीतून आमचा काम, आमच्या फाईली येतत. त्या फाईलीचो मुसळधार पाउस पडानदे रे महाराजा.. व्हय म्हाराजा.

देवा म्हाराजा, आमचे सगळे पेशंट्स परत परत, परत परत आजारी पडान देत. त्यांना सर्दी, पडसा, ताप, खोक्लो, पोटदुखी, अल्सार, उलटी आणि काय काय समद होऊनदे रे महाराजा व्हय म्हाराजा.

देवा म्हाराजा, त्यांच्या फाईली टायप करून त्यांचो रोकडा मिळाल्यावर त्यांना खडखडीत बरो करून उदंड आयुक्ष देरे महाराजा. व्हय म्हाराजा.

देवा म्हाराजा, आमच्या लॅब मधल्या एसीवर कुणा अद्मीनने, कुणा HR ने कायपण करणी केलेली असल तर त्यांना मोठ्या मनाने माफ करून ती करणी लवकर दूर करून टाक रे महाराजा.... व्हय म्हाराजा.

देवा म्हाराजा, आमी आमच्या गप्पा, गोष्टी, चेष्टा, मस्करी, Whats App, Facebook या समद्यातून वेळात वेळ काढून मोठ्या कष्टाने फाईली टायाप्तो. आमचो लाईन काउंट वाढावा म्हणून अद्मिंस आमाला चांगल्या चांगल्या, मोठ्या मोठ्या, सोप्या सोप्या, स्पष्ट स्पष्ट फाईली देऊदे रे महाराजा. व्हय म्हाराजा.

देवा म्हाराजा, या फाईली टायपताना आमाला कोट्यावधी प्रोब्लेम्स येतत. कधी मेडिकल एरार, कधी दवादारूची एरार, कधी मनातलोच शेमटूशेम पण भलताच ऐकू येता ती एरार ,कधी तर डायरेक थडग्याचो एरार होता. त्या समद्या एरार अमी मुद्द्म्सून, जाणूनबुजून, त्यांना त्रास द्यायला, त्यांची परीक्षा घ्यायला करत नाय हे त्या एडिटर्सच्या डोस्क्यात लाईटीच्या उजेडाप्रमाणे पडानदे रे महाराजा...,
देवा महाराजा, गेल्या बारा सालात आमाला इन्क्रिमेंट मिलालेलो नसत. तरी पण आमच्या पप्पांच्या हृदयाला प्रेमाचा पाझर फुटूनशान आमाला प्रत्येकी ५००० चो इन्क्रिमेंट, दिवाळीला एका पगाराचो बोनस, पीएफ, ग्रुप इंसुरंस, सलरी अकौंट, आणि सकाळ संध्याकाळ नाश्ता देण्याची बुद्धी आमच्या पप्पांना दे रे महाराजा व्हय महाराजा....

देवा महाराजा, आमच्या चांगल्या चांगल्या अकौंटवर कोणी काय वाकडा नाकडा केला असात, चेटूक केला असत, करणी केली असत, तर ता बाहेरच्या बाहेर निघाण जाऊंदे रे म्हाराजा....... व्हय म्हाराजा.........

देवा महाराजा, आमी पोरी घरी सगळी कामे धामे करून, पोराबाळांना डबे डूबे देऊन, ट्रेन मधून, बस मधून, रिक्षातून, बाईक वरून, कार मधून दमून भागून येतो आणि आल्या आल्या आमच्या बोटाचो ठसो देतो त्या माशिनिचो घड्यालाचो काटो सकाळी सोलो आणि संध्याकाळी फासट कर रे महाराजा. व्हय म्हाराजा.....

आमी पोरी दिवसभर फाईली वर फाईली, फाईली वर फाईली, फाईली वर फाईली करतो. अधून मधून आमच्या लाब मध्ये कोणी सलमान, कोणी अर्जुन, कोणी हुडा टेस्ट साठी पाठिव रे महाराजा. व्हय म्हाराजा.....

देवा महाराजा, तुज्या समोर ह्यो नारळ फोडतय. तो नारळ कबुल करून घे आणि समद्या स्टाफच्या साईटीने मी ह्या जे जे काय बोललेलो असा, त्ये  त्ये समदं खरा करून टाक र महाराजा .....

व्हय महाराजा.

-स्वाती भगतीण


(स्वाती-छत्रे मायदेव)
१४ मार्च २०१४

अनोळखी मुशाफिरा

"अनोळखी मुशाफिरा"

गाडीचा वेग आता वाढला होता. थंडी अधिकाधिक जोर धरत होती. बाळ तर अगोदरच रेशमी गोंडस पावलांपासून ते डोक्यावरील नुकत्याच उगवत असलेल्या सोनेरी मऊसर केसांपर्यंत पूर्णपणे लोकरीच्या कपड्यांमध्ये लपेटलेले होते. तरी देखील त्याला थंडीपासून अजून वाचवण्यासाठी चारूने आपल्या खांद्यावरची शाल काढून त्याच्या भोवती मायेचे अजून एक कवच गुंडाळलेच.

राजन त्याच्या Readers' Digest मधून बाहेर यायला अजून तयार नव्हता. शिवाय एकापाठोपाठ एक फोन्स चालू होते.

समोरच्या बर्थवरचा तरुण कधी पासून चारूच्या हालचाली टिपत होता. चारुची बाळावरची माया तो कुतूहलाने पाहत असलेले तिला स्पष्टपणे जाणवत होते. त्याच्या नजरेत तिला कमालीचा आपलेपणा आणि तिच्याबद्दलची काळजी जाणवत होती.

हा कोण कुठचा माणूस का बर माझ्याकडे बघतोय एवढा असे तिला अजिबात वाटले नाही. उलट त्याला आपले बाळावरचे प्रेम आवडलेय हे तिला कळत होते आणि त्यामुळे तिला एक प्रकारचे वेगळेच सुख मिळत होते.

राजनचे चारू आणि बाळापेक्षा  स्वत:त गुंतलेले असणे त्याला खूप त्रस्त करून जातेय हे देखील तिला जाणवत होते. असे एखाद्या परक्या तरुणाने आपल्या नवऱ्याचा राग करावा हे तिला खरेतर आवडत नव्हते पण तरी देखील आपल्याला कोणीतरी जाणतेय हि भावना तिला सुखावून गेली.

ट्रेन आता त्यांच्या उतरण्याच्या ठिकाणाला पोचायला काही मिनिटांचाच अवधी होता. राजनचा फोन खणाणला. त्याच्या बोलण्यावरून जाणवत होते कि त्याला त्याच्या कोणत्यातरी क्लायंटचा फोन आहे आणि राजन त्याला त्याच्या कंपनीचे प्रोडक्ट विकण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.

इथे गाडी स्टेशनला लागली होती. हळूहळू वेग कमी होत होता. उतरणारे सगळे प्रवासी सामान घेऊन उतरण्याची तयारी करू लागले. राजन देखील एकीकडे फोनवर बोलत बोलत सामान काढू लागला. एकच bag होती. ती त्याने घेतली. आणि तो सरळ गाडीच्या दरवाजापाशी जाऊन उभा राहिला. क्षणभर देखील त्याने बाळाकडे किवा चारूकडे पहिले नाही. गृहीत धरले होते तिला.

चारूने तिच्याकडची छोटी bag खांद्याला लावली. बाळाला घेऊन ती राजनच्या पाठून चालू लागली. मात्र ती bag आणि बाळ दोघांना घेऊन पुढे जाणे तिला नीट जमत नव्हते. "अरे राजू, जरा ही bag पकड न.." चारू राजनला हाक मारत सांगत होती. पण राजनने त्याचे फोन वरचे बोलणे चालूच ठेवले. उलट तिला खुणावून "एक मिनिट थांब गं.." असे सांगत होता.

गाडी थांबली. उतरणारे सर्व प्रवासी उतरले. राजन उतरला. फोन वर बोलत थोडा पुढे गेला. आता बहुतेक क्लायंटला प्रोडक्ट पटलेले होते आणि डील संदर्भात बोलणी सुरु होती.

गाडी सुरु होण्याअगोदर चारुला उतरणे आवश्यक होते. Bag आणि बाळ दोघांना सांभाळत दरवाज्याच्या दिशेने कूच करण्याचा आटोकाट प्रयत्न ती करत होती. तेवढ्यात समोरचा तरुण पुढे झाला. त्याने तिची bag हातात घेतली. तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला दरवाजापर्यंत आणले. आणि खाली उतरण्यास मदत केली.

तिच्या बरोबर तो देखील खाली उतरला. आपली शाल काढून तिच्या खांद्यावर गुंडाळली. त्याच्या नजरेत तिच्या बद्दलचा आदर आणि काळजीयुक्त माया पूर्णपणे जाणवत होती. तिचा हात आपल्या हातात घेऊन केवळ दोन शब्द तो म्हणाला.. "काळजी घे." आणि तो परत गाडीत चढला. गाडी सुरु झाली.

चारू जागीच स्तब्ध उभी राहून डोळ्यासमोरून नाहीशा होणार्या गाडीकडे पाहत राहिली.

तिच्या मनात चित्रपटातील दोनच ओळी रुंजी घालू लागल्या.

"कधीतरी, कुठेतरी फिरून भेटशील का..?
अनोळखी मुशाफिरा, वळून पाहशील का..??"


- स्वाती छत्रे-मायदेव.

कोहम

"कोहम..."

"दो चर्चगेट रिटर्न देना" असं म्हणून त्याने तिकीट काउंटर वरून २ तिकिटे घेतली. पैशांची देवाणघेवाण झाली आणि तो वळला. त्याचे बोट धरून उभ्या असलेल्या छोटूकलीला बरोबर घेऊन प्लाटफॉर्मनंबर १ च्या दिशेने जाऊ लागला.

अचानक त्याने तिचा हात सोडला. दोघेही एकमेकांकडे पाहून कसलातरी विचार करू लागले.

तो कमालीचा भेदरला.

छोटुकलीला ज्यूसचा एक स्टौल दिसला. तिने ताबडतोब तिकडे मोर्चा वळवला.

याच्या डोक्यात विचारांचे थैमान सुरु झाले.

"मी कुठे आहे?"

"कुठे आहे?" "नाही नाही..." "मुळात मी कोण आहे?"

त्याला दरदरून घाम फुटला. "मला स्मृतिभ्रंश झालाय का?"

"पण स्मृतिभ्रंश झालाय का हा प्रश्न मला पडतोय म्हणजे स्मृतिभ्रंश हा एक रोग आहे वगैरे हे तर आठवतय की मला. मग मला मी कोण आहे हेच का नाहीये आठवत? स्मृतिभ्रंश मध्ये अस होत का?"

त्याने पटापट आपल्याला काय काय आठवतंय यावर विचार सुरु केला.

"पाढे आठवतायत, शाळेत आपण शिकलो हे आठवतय. पण कोणत्या?
नाही आठवत. गणिते आठवतायत पण शिक्षक नाही आठवत. अनेक कविता आठवतायत.. पण कवींची नावे नाही आठवत.  क्रिकेट आठवतय. खेळाडूंची नावे नाही आठवत. देश अशी कन्सेप्ट असते हे आठवतय, पण देशांची नावे नाही आठवत. "

"आणि माझ्या देशाच नाव?????? नाही आठवत !."

"जात, धर्म, पंथ... अस असत सगळं.... पण माझं यातलं कोणतंय...
नाही आठवत."

भेदरला तो.  जबरदस्त घाम फुटला त्याला. तो आजूबाजूला पाहू लागला...

सगळे जण भेदरले होते. सगळ्यांनाच घाम फुटला होता.

प्रत्येक रस्त्यावर. प्रत्येक घरात...

प्रत्येक देशात !!!

एकच अवस्था...

कोहम !


- स्वाती छत्रे-मायदेव.
१ मार्च २०१५

आधा सुपारी

क्या भाय,

कैसाय तू ? चाय पानी सब ठीक ना ?

तेरको एक गुड न्यूज बतानेका भाय | कल्को तो अपुन एकदम बड़ा डोक्टर बन गया रे | फिर क्या ! बड़ा बोले तो एकदम बड़ा.. वो अपना पोलियो का दो बूंद पिलाने वाला आता है न उस्से भी बड़ा.. बोले तो अपना दात निकालनेवाला शाह  है ना उस्से भी बड़ा.. अरे बोले तो वो साला अमिताब का पेट का ओप्रेसन किया न उस्से भी बड़ा |  फिर क्या !
उस्का क्या हुआ ना कल रात्कू अपने कल्लुके कलेजेमे दरद हुआ... इत्ता तड़प रहा था, इत्ता तड़प रहा था.. क्या बोलनेका ... अपुनसे देखा नहीं गया रे.. फिर क्या !

अपने इदर तो तेरको मालूम. हॉस्पिटल, दवाखाना है क्या? घंटा !!! क्या करनेका? इत्ता जोरका बारिश.. क्या बोलू.. बोलेतो एकदम छब्बीस जुलाई रे.. फिर क्या !

फिर भोत सोचा... भोत सोचा. फिर एकदम से अपना दिमाग का बत्ती जला.. वो आमिर खान ने कैसा करीना के भेनका डिलीवरी किया था ना.. वैसाच किया मैंने. फिर क्या !
अरे अपुनका वोट्सअप काम आया | अपुनका एक ग्रुप में एक बड़ा डोक्टर रे. उसको पिंग मारा.  उसको बोला... तू बोल.. मै इदर वैसाइच करेगा.. उसको अपुन्पे पूरा भरोसा होने का... फिर क्या ! मैंने वो जीतू का मोबाइल कैसा चुराया उसका पोस्ट डाला था न.. तबसे अपुनका पंखा रे वो.. फिर क्या  ! वो भी एकदम मस्का रे... क्या मस्त बताया उसने..
उस्ने अपनुको मेसेज डाला क्या क्या करनेका वो.. पूरा डिटेल.. सिर्फ एक प्रॉब्लम था रे. अंग्रेजी में लिक्का साला.. फिर अपना छोटू है न ८ वी फेल.. उसकू बुलाया. छोटूको पढनेका... सोचनेका.. बोलनेका.. फिर अपुन दिमाग लगानेका.. वैसाच करनेका.. फिर क्या !

और ओप्रेसन एकदम सिंपल रे.. फिर क्या !

देख तेरेकू पूरा रिपोर्ट बोल्ताय... डोक्टर का मेसेज देख.
"Take the patient to the operating room, place on the table in supine position, placed under adequate general anesthesia.  Prep and drape in a normal sterile fashion from the chin to the toes bilaterally.  Make a sternotomy incision. Divide the sternum.  Open the pericardium. Use Tack-up suture to create a pericardial well.  Administer Heparin per anesthesia.  Place pursestring sutures in the ascending aorta and right atrial appendage and replace the cannula appropriately.  Place the patient on full cardiopulmonary bypass.  Empty the heart and allow to fibrillate.  Place the Cross clamp in the ascending aorta.  Use blood cardioplegia to arrest the heart in an antegrade fashion through the aortic root.  Once the heart is arrested, open the left atrium along Waterston's groove and expose the mitral valve using a retractor.........."

(और भोत कुछ लिखा था रे.. लेकिन तू सब पढ़ेगा न तो तेरको चक्कर आयेगा रे.. इसके लिए थोडासा ही पढ़ाया तेर्कू.. समझ जा.. कितना सब करनेको बोला था.. अपुन क्या क्या किया सोचके कुछ तो कदर कर अपुनका.. फिर क्या !
आगे सुन. छोटू ने बताया मैंने दिमाग लगाके किया.. क्या किया सुन.

तबेला खाली था.. घास बिछाया.. कल्लू को लेटाया.. वो क्या भूल देनेको बोला था.. क्या करनेका? फिर गांजा पिलाया सालेको... फिर रामपुरी निकाला... कल्लुके छाती पे चलाया.. मस्केके माफिक.. उसका हार्ट ओपन किया.  होल बनाया... वो क्या डिवाइड करनेकू बोला था वो डिवाइड किया.. चिकना चमन भांग बनाताय न एकदम वैसा... एकदम क्लीन डिवाइड.... वो जिदर कुवा बनानेको बोला था न उदर कुवा बनाया. फिर आगेका छोटू को बतानेकोच नहीं होनेका..
फिर क्या. अभी हार्ट तो खोलेला था न.. ऐसाच छोड़ नहीं सक्ताय...

फिर मै..
रामपुरी..
गांजा..
टंकीका वोल्व..
साईं बाबा के फोटो के हारमे से निकाला हुआ प्लास्टिक का धागा..
बरफ..
सिगरेट का लायटर..
और क्या क्या किदर किदर से निकालके सब..
पूरा एक घंटा लगा.. ओप्रेसन सक्सेस्फुल्ल...
मस्केके माफिक..
कल्लू सोया है शांत..
उठेगा तभी बोलताय तेरको..
फिर क्या !

चल अब जाताय मै.. अबी एक ट्रेन आनेवाली है. देकताय कितना पाकिट मिलताय मार्नेको. सोच रहा हु थोड़ा पाइप, वोल्व, वगैरा खरीद्के रखेगा.. तेरा ओप्रेसन करनेका होयगा तो बोल हा..

तेरा अपना..

आधा सुपारी

(स्वाती छत्रे मायदेव)
दोर

देवा, तू भलता हुशार आहेस
दहा वेळा विचार करतोस
दु:ख पदरी टाकताना
सोसवेल त्यालाच देतोस.

मार्गात माझ्या दरी येता
कडा नाही पायवाट दिलीस
मोठमोठ्ठ्या पत्थरांची
मऊ मऊ ढेकळं केलीस

परतीचा मार्ग येता
जम्बोजेट नसलं, चालेल.
पण कधी तुटणार नाही
असा भक्कम दोर दे.
असा भक्कम दोर दे.


-स्वाती छत्रे-मायदेव

(८ ऑगस्ट २०१३)

Wednesday, July 6, 2016

मुलाखतकार आणि निवेदक

"मुलाखतकार आणि निवेदक"

कित्येकदा मुलाखती रंगतात त्या मुलाखत घेणाऱ्याच्या कसबावर. संगीताचे कार्यक्रम अधिक बहारदार होतात ते निवेदकांनी केलेल्या रंजक निवेदनावर.

सुहासिनी मुळगावकर, वा. य. गाडगीळ, अशोक रानडे, सुरेश खरे, सुधीर गाडगीळ, मंगला खाडीलकर, विश्वास मेहेंदळे, राजू परुळेकर आणि हिंदीमध्ये माझ्या लक्षात राहिलेले तबस्सुम, सिमी गरेवाल, जब्बार पटेल आणि गुजराती मध्ये अदी माजबान, सबीरा मर्चंट अशी कित्येक मंडळी हे कार्यक्रम बहारदार करत आली आहेत.

या लोकांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भाषेवरच प्रभुत्व, आवाजावरची पकड आणि ज्या विषयाशी निगडित कार्यक्रम आहे त्या विषयाचा दांडगा अभ्यास.

ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याला एकदम comfortable करत त्याच्याकडून कार्यक्रमाला अपेक्षित असलेली माहिती काढून घेणे, मुलाखतीला जर चुकून वेगळे वळण लागले तर मुलाखतीची गाडी परत रुळावर आणणे या गोष्टी अतिशय कौशल्याने हे लोक हाताळतात.

संगीत कार्यक्रमामध्ये तर कित्येकदा मला या निवेदकांच्या छोट्या मोठ्या रंगतदार कथांनी खिळवून ठेवले आहे.

प्रतिभा आणि प्रतिमा, गजरा, शरदाचे चांदणे, शब्दांच्या पलीकडले, नक्षत्रांचे देणे,  संवाद, वाद संवाद, फुल खिले हैं गुलशन गुलशन, आवो मारी साथे हे विशेष लक्षात राहिलेले कार्यक्रम.

पु. लं. ची जब्बार पटेलांनी घेतलेली मुलाखत तर कित्येकदा पुनःपुन्हा पहिली आहे मी. राजू परुळेकर साठी म्हणून मुद्दाम सकाळची घाईची वेळ असली तरी संवाद कित्येकदा आवर्जून पाहिलाय.

या मंडळी म्हणजे दुधात साखर असल्याप्रमाणे कार्यक्रमात विरघळून त्याला सुमधुर, बहारदार करतात.

दुग्धशर्करा !


-स्वाती छत्रे-मायदेव
Monday, July 4, 2016

Since ages I have not blogged !!!

Kuch cheeje reh gayi hai explore karneki.... trying out this blogging shogging !!!

Reintroducing my favorite poem (?) written by me (of course ) :-)

Hope you all will like it !!!मई आया.. फ्राम थेरीनापोड्डी
पेनता मई... पिंग लुंगी
मई जाता.. जिदर जिदर बी
मेरेकू आता.. बस प्राबलमही

मई देका.. एक लडकी
सुनके मेरी.. अम्मा भडकी
लडकीको छोडा.. अम्माको बोला
देखुंगा नही अब.. कोईबी लडकी
मई आया.. फ्राम थेरीनापोड्डी
पेनता मई... पिंग लुंगी
मई जाता.. जिदर जिदर भी
मेरेकू आता.. बस प्राबलमही

मई पहुंचा. बस इस्टाप
उदरसे आया.. एक बस
बस्कू देका... नंबर पडा
कौन जाने.. क्या ता लिक्का
बसके जाते.. दिक्का मेरेकू
दारवाजेपे.. इंग्लिस नंबर
रामा रामा.. अब्बी समजा
चला गया वो.. मेरा बस ता
मई आया.. फ्राम थेरीनापोड्डी
पेनता मई... पिंग लुंगी
मई जाता.. जिदर जिदर बी
मेरेकू आता.. बस प्राबलमही

नारयल बेचा.. गराज खोला
देकते देकते.. आमीर हुआ
गाडी लिया.. बंगला लिया
गाडी मे बईठके बंगलेपे गया
बंगलेपे जाके दोसा बनाया
चटनी पावडर, सांबार बनाया
चावलके साथ मे बहोत खाया
चद्दर ओडके मस्त सोया
सुबेकू ऊट्टा.. टेरेसपे गया
निचू देका... डर लग्गा
भागते भागते.. निच्चू आया
आते आते.. पैरमे मेरे
पिंग लुंगी.. मेरा अटका
मई निच्चू.. लुंगी उप्पर
रामा रामा.. प्राबलमही प्राबलम
मई आया.. फ्राम थेरीनापोड्डी
पेनता मई... पिंग लुंगी
मई जाता.. जिदर जिदर भी
मेरेकू आता.. बस प्राबलमही

छोड भी दो तुम.. पकडो मत्त
मेरा प्यारा पिंग लुंगी.
मेरा प्यारा पिंग लुंगी.
मेरा प्यारा पिंग लुंगी

-स्वाती छत्रे-मायदेव
५ डिसेंबर २०१३

(हि कविता केवळ गमत म्हणून केलेली आहे. या कवितेला केळ आणि केवळ हलके घेणे. यावरून कृपया प्रांतवाद वगैरे सुरु करू नये :D).