Thursday, July 14, 2016

पैशाची नाही... अजूनही प्रेमाची आहे दुनिया

पैशाची नाही... अजूनही प्रेमाची आहे दुनिया

रुपारेलला असताना आमच्या लेडीज रूमच्या जवळ कॅन्टीन होत तिथे बटाटावडा मिळायचा एकदम सॉलिड. तिथे पुष्कळदा वडा खाल्लाय.

वडे तळताना बेसनाचे काही थेंब गरम तेलात पडल्यावर ते तळून जो कुरकुरीत चुरा तयार होतो त्याकडे आम्हा मैत्रिणींची सतत नजर जायची. आम्ही त्या कॅन्टीनवाल्याला तगादा लावायचो कि आम्हाला तो चुरा दे थोडा म्हणून. सुरुवातीला एक दोन वेळा दिला त्याने पण नंतर मात्र तो अजिब्बात द्यायचा नाही.

"हे खाऊ नका ताई... घसा धरेल"

आज सौरभ सांगत होता कि आई अग काल मी आणि माझा मित्र रात्री उशिरा अभ्यास करून मग डोसेवाल्याकडे जाऊन डोसा खात होतो तेव्हा तिथे एक मुलगा आला होता.

 डोसेवल्याकडच पीठ संपलं होत. शेवटचा एक डोसा होणार होता. तो त्या डोसेवाल्याला स्वतः खायचा होता अस तो नुकताच म्हणाला होता. या मुलाने डोसा मागितल्यावर तो प्रथम नाहीये म्हणाला पण मग त्या मुलाच्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला "ठीक है शायद एक बन पायेगा । खाके जाना बेटा । "

असे अनुभव आले कि एवढं क्षणोक्षणी पैसा पैसा करणारी दुनिया अजून कशी चालली आहे या प्रश्नाचे उत्तर मिळते.


स्वाती छत्रे मायदेव

Tuesday, July 12, 2016

चेंज ऑफ व्हॉईस !!!

चेंज ऑफ व्हॉईस !!!

फ्रॉम ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह.

तुम्ही कधी कधी एखाद्या व्हरच्युअल वर्ल्ड (व्हाट्सऍप, फेसबुक, शॉपिंग साईट्स, गेम्स) मध्ये इतके गुंगून जाता कि रिअल वर्ल्ड मध्ये आपल्या आजूबाजूला कोण आहे, काय बोलतंय त्याच भान राहत नाही.

तुमच्या बरोबची व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगत असते. मग थोड्या वेळाने एखादा प्रश्न विचारते आणि तुम्ही आभासी दुनियेत गुंग. तुम्ही सवयीने "हो हो" किंवा "हा हा" म्हणता. पण तेव्हा तिथे खरतर काही उत्तर अपेक्षित असत.

मग तुमच्या बरोबरच्या व्यक्तीला कळून चुकतं कि इतका वेळ आपली चाललेली बडबड हि म्हणजे नेट कनेक्शन गेलं असताना केलेल्या कमेंट्स होत्या.

मग ती व्यक्ती तुम्हाला वैतागून परत तो प्रश्न मोठ्याने चिडून विचारते. तेव्हा मग तुमच्या रिअल वर्ल्ड wifi चा विक झालेला सिग्नल ब्लिंक होत होत ग्रीन होतो.

मग अचानक रिअल वर्ल्ड wifi सिग्नल मिळाल्यावर सगळे मेसेजेस टुंग टुंग किंवा टिंग टिंग करत तुमच्या मेंदूच्या सेल वर यायला लागतात. थोड्या वेळ तुम्ही हँग होता.

इथे ती व्यक्ती रागाने अँग्री इमॉटिकॉन झालेली असते.

मग तुम्ही वेळ मारुन न्यायला त्याच्या प्रश्नाचं उत्तर एकदम मोठ्या आवाजात द्यायला सुरु करता. हाच हाच तो ऍक्टिव्ह व्हॉईस. तुम्ही अचानक खूप ऍक्टिव्ह होऊन जाता. आणि मग समोरच्याच्या चेहरायावरचे भाव बघून तुम्हाला कळून चुकते कि आपलं थोडं "1g" च्या जोरावर high resolution विडिओ अपलोड करणं चाललंय.

मग तुमचं ऍक्टिव्ह व्हॉईस ने सुरु झालेलं वाक्य शेवटच्या शब्दावर येईपर्यंत पस्सिव्ह होऊन जात. इतकं पॅसिव्ह होत कि त्या high resolution विडिओ च रूपांतर चक्क एका plain smiley emoticon मध्ये होत.

होतो का तुमचा पण असा ऍक्टिव्ह व्हॉईस टू पस्सिव व्हॉईस मध्ये बदल ?

(अतिहुशार लोकांसाठी - हा ऍक्टिव्ह व्हॉईस आणि पस्सिव व्हॉईस इथे इंग्लिश ग्रामर च्या संदर्भात वापरलेला नसून केवळ आपल्या मुखातून येणाऱ्या व्हॉईस च्या टोन संदर्भात वापरला आहे याची नोंद घ्यावी)

- स्वाती छत्रे मायदेव

चौथीच्या पुस्तकातला इतिहास.

एखाद्या देशाला इतिहास असावा तर मराठी चौथीच्या पुस्तकातल्यासारखा. नाहीतर मग नसावाच.

सौरभ चौथीत होता तेव्हा माझं खूप मोठ्ठ सौभाग्य म्हणून एक पूर्ण वर्ष मी घरी होते.

रायरेश्वराच्या मंदिरातील शपथ, त्यावेळी मावळ्यांची साथ, प्रतिपतचंद्रलेखेव ची मुद्रा सगळं सगळं वाचताना डोळ्यांनी अमृत प्यायल्यासारखं वाटायच. किती वेळा वाचलं असेल ते पुस्तकच जाणे.

कित्येक संवाद मी आणि सौरभ अगदी नाटकातल्यासारखे म्हणायचो. आमचा बेड म्हणजे एखाद्या गडाचा तट व्हायचा. जो काही आवेश असायचा आमचा कि बस रे बस.

बाजीप्रभूंचे संवाद तर अगदी त्वेषाने म्हणत असू. "एक बाजी गेला तर तुम्हाला अनेक बाजी मिळतील. पण देशाला शिवाजी महाराजांची गरज आहे." "बहादूर मर्दांनो, हुश्शार ! प्राण गेला तरी जागा सोडू नका. गनीमाला गड चढू देऊ नका." "महाराज गडावर पोचले. आता मी सुखाने मरतो."

दिलेरखान मुरारबाजीला म्हणतो "तुझ्यासारखा पराक्रमी पाहिला नाही. तू आमच्यात ये. अभय देतो" तेव्हाचा मुररबाजीचा संवाद तर हृदयात कोरलेला "अरे आम्ही शिवाजीमहाराजांची माणसे. तुझा कौल घेतो कि काय? तुझी जहागीर हवी कोणाला?"

आणि "आधी लगीन कोंढाण्याचे!" "आणि मग "गड आला पण सिह गेला" हे म्हणजे डबडबले डोळे आणि अभिमानाने भरलेला ऊर.

आणि व्यक्तिगतपणे माझा या इतिहासातील अत्यंत आवडता प्रसंग म्हणजे तानाजी धारातीर्थी पडल्यावर सुर्याजीने मावळे खचून पळून जाऊ नयेत म्हणून कापलेला दोर. सूर्याजी म्हणजे माझा अल्टिमेट हिरो. "अरे, तुमचा बाप इथे मारून पडला आहे. तुम्ही असे भागूबाई सारखे काय पळता? मागे फिरा. मी दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या मारून जीव द्या नाहीतर शत्रूशी युद्ध करा." असे ठणकावत त्याने आपल्या भावाच्या म्हणहेच तानाजीच्या बलिदानाचे चीज केले आणि गड घेतला.

असे जीवाला जीव देणारे मावळे आणि स्वराज्याची शपथ घेऊन श्रींचे राज्य घडवणारे शिवबा आणि त्यांना हे बाळकडू देणारी आई जिजाऊ आणि छत्रपतींना घडवणारे दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी सगळे एकसे एक !!!

या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाने मी आणि सौरभ खूप जवळ आलो एकमेकांच्या भावविश्वाच्या.

सौरभला मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्याचे समाधान तेव्हा मिळाले अगदी नक्की !!!

स्वाती

Thursday, July 7, 2016

तुळशीचं पान.

तुळशीचं पान.

त्याच्या समोर तराजू !!!

एका पागडीत माझं प्रारब्ध.
त्यावर पापांच्या राशी... माझ्या !!!
त्यावर पत्रिकेतील रुसलेले ग्रह गोल.
त्यावर अजून काय काय काय !!!!

दुस-या पागडीत मग आहेच
थोडं-फार पुण्य... कमावलेलं !!!
त्यावर मग नवस-सायास.
त्यावर फारसं अजून काय असणार !!!

पण मग अचानक कुठूनशा आल्या
तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा !!!!!!!!!!
आणि मग अचानक...
झालं कि पारडं जड. पुण्याच... माझ्या !!!!

तुळशीच पान तुळशीच पान म्हणतात ते हेच, हेच, हेच !!!

स्वाती छत्रे-मायदेव २७ नोव्हेंबर २०१३

शेवाळं

शेवाळं


शेवाळ्याला म्हणतात सगळे
"श्शी ! गलिच्छ !!!"

मी मात्र त्याला म्हटलं,
"मला तुझं कौतुक वाटतं
बिकट परिस्थतीत
काही करून तग धरतं"


शेवाळं हसलं.
मला म्हणालं,

"मला देखील वाटतं गं
वृक्षासारखं उंच व्हावं.
उंच उंच आभाळात
पक्षासारखं विहरावं."

"पण मी तरी काय करणार
माझा कुठे इलाज असतो.
मात्र नशिबाला दोष देत
जगणं सोडायचं नसतं."

"आसवे ढाळून ढाळून
संपणार कधीच नसतात.
जेवढी ढाळू तेवढीच
जिद्दीने दाखल होतात."

"यावर एकच उपाय असतो
त्यांच्यातच रमायचं नसतं.
ओठांवर हासू आणत
आसवांना हटवायचं असतं."

शेवाळ्याचं म्हणणं ऐकून
माझं मलाच नवल वाटलं.
कारण त्याच्यामध्ये मला
माझंच वेडं मन दिसलं !

- स्वाती छत्रे-मायदेव
(७ ऑगस्ट २०१३ )

बालपणीचा काळ सुखाचा

मधेच कधीतरी वरच्या मजल्यावरून अचानक गॅस सिलिंडर (मुद्दाम) हलवल्याचा आवाज ऐकू येतो.. मग खालच्या मजल्यावरची "ती" वरच्या मजल्यावरच्या "ती" ला खूण म्हणून खुर्ची सरकावल्याचा आवाज करते. खुणेची निशाणी पटते.

मनात एक प्रकारचे थ्रील ओथंबबून भरते...

मग स्वयंपाकघरातील सिंक च्या बाजूच्या छोट्या खिडकीत खालच्या मजल्यावरील "ती" अत्यंत उत्कटतेने वाट बघत बसते. थोड्याच वेळेत त्या खिडकीत वरून एक गुड नाईट चा बॉक्स एका दोरीला बांधून खाली येतो. खालच्या मजल्यावरील "ती" तो बॉक्स पकडते व आत घेते. उघडते.

आत अत्यंत साधा टुकार मेसेज असतो एका चिट्ठीवर... "काय करतेयस ?" किवा तत्सम काही. पण तो मेसेज वाचणारीला आनंदाचे भरते आलेले असते. मग ती पण त्या चिट्ठीवर उत्तर लिहिते. "काही नाही.. सुहास शिरवळकरांच शायलक वाचतेय." मग परत एकदा खुर्ची सरकावल्याचा आवाज होतो. परत वरून  गॅस सिलिंडर हलवला जातो. आणि चिठ्ठ्यांचा सिलसिला चालू राहतो...

"संध्याकाळी गच्चीवर भेटूया न?"

"हो. चालेल."

"किती वाजता?"

"५ वाजता?"

"चालेल."
 "..."

"..."

"..."

अशा अनेक आठवणी ताज्या झाल्या जेव्हा वरच्या मजल्यावर राहणाऱ्या "शिवानी" ला भेटले...

*****************

किस्सा नंबर २ ...

"ए, भुते असतात का खरच?" वंदू म्हणाली...

"काय माहित?" इति: शिवानी...

बघूया का रात्री आपणच? - अस्मादिक...

मग ठरलं.. वंदू, शिवानी आणि स्वाती भेटणार रात्री बारा नंतर कॉलनीत खाली. पण १२ पर्यंत जागे कसे राहणार?

"आग, सुरीने जखम करून घेऊया हातावर... आणि त्यावर मीठ चोळून ठेवूया... म्हणजे झोप नाही येणार आणि १२ वाजले कि उतरू खाली..." वंदूचे भन्नाट डोके...

ठरलं.. आणाभाका झाल्या...

प्रत्यक्षात १२ वाजता सगळ्या भूतानी वाट पहिली पण तिघी जणी आपापल्या आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या होत्या... :D

*******

बालपणीचा काळ सुखाचा...

अत्यंत छोट्यात छोट्या गोष्टींमध्ये पण प्रचंड थ्रिल...

आनंद !!!!

अवर्णनीय !!!!

स्वर्गीय सुख

<3 p="">

सुख-दुःखाच्या वाट्या

सुख-दुःखाच्या वाट्या

मला दोन वाट्या मिळाल्या
एक मातीची, एक लोखंडाची
देवाने मनाचे दोन कप्पे केले
एक सुखाचा, एक दु:खाचा

सुखाच्या कप्प्यात मी लोखंडाची वाटी ठेवली
आणि दुःखाच्या कप्प्यात ठेवली मातीची
सुखाच्या पावसाने वाटी मस्त भरायची
दुःखाच्या पावसाचा निचरा व्हायचा

मग.. हळू हळू... परिस्थितीचे हातोडे पडले
सुखाच्या वाटीचा ठोकून ठोकून पातळ पत्रा झाला
दु:खाच्या वाटीचा मऊ भुसभुशीत चुरा झाला

मनाचं आता रिनोवेशन केलय
नव्या को-या वाट्या घेतल्या
आता सुखाच्या कप्प्यात मातीची
दुःखाच्या कप्प्यात लोखंडाची वाटी

आता येऊ देत दु:खाचा कितीही पाउस
जेवढ्या जोराने आदळेल तेवढ्याच जोराने परतेल
आणि सुखाच्या चार थेंबांचे शिडकावे पण मुरतील.. खोलवर.

स्वाती छत्रे-मायदेव
१ डिसेंबर २०१३