Thursday, July 7, 2016

सुख-दुःखाच्या वाट्या

सुख-दुःखाच्या वाट्या

मला दोन वाट्या मिळाल्या
एक मातीची, एक लोखंडाची
देवाने मनाचे दोन कप्पे केले
एक सुखाचा, एक दु:खाचा

सुखाच्या कप्प्यात मी लोखंडाची वाटी ठेवली
आणि दुःखाच्या कप्प्यात ठेवली मातीची
सुखाच्या पावसाने वाटी मस्त भरायची
दुःखाच्या पावसाचा निचरा व्हायचा

मग.. हळू हळू... परिस्थितीचे हातोडे पडले
सुखाच्या वाटीचा ठोकून ठोकून पातळ पत्रा झाला
दु:खाच्या वाटीचा मऊ भुसभुशीत चुरा झाला

मनाचं आता रिनोवेशन केलय
नव्या को-या वाट्या घेतल्या
आता सुखाच्या कप्प्यात मातीची
दुःखाच्या कप्प्यात लोखंडाची वाटी

आता येऊ देत दु:खाचा कितीही पाउस
जेवढ्या जोराने आदळेल तेवढ्याच जोराने परतेल
आणि सुखाच्या चार थेंबांचे शिडकावे पण मुरतील.. खोलवर.

स्वाती छत्रे-मायदेव
१ डिसेंबर २०१३

No comments:

Post a Comment