Monday, December 29, 2008

मंचरकर गुरूजी

"तेथे कर माझे जुळती"

एखादे दिवशी संध्याकाळी अचानकपणे दारावरची घंटा वाजते. दार उघडल्यावर समोर प्रसन्न चेहेऱ्याने असतात पांढरी टोपी, सदरा, लेंगा घातलेले वयस्कर मंचरकर गुरूजी. आपण "या, बसा" म्हणेतो ते आपल्याला विचारतात की घरी सगळ्यांच्या तब्येती, कामधंदा, अभ्यास सर्व काही सुरळीत चालू आहे ना?

मंचरकर गुरूजी - अतिशय साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी. मूंबईसारख्या सधन वस्त्यांमधून स्वत: फिरून खेडोपाड्यातील, दुर्गम गावांतील, आदिवासी वस्त्यांमधील लोकांना काही ना काही मदत मिळावी यासाठी झटणारे.. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय वर्गाशी निगडित न रहाता त्यांचा हा सगळा उद्योग चालू असतो.

वयस्कर असूनही ते घरचे सर्व काम आटोपून, आपल्या आजारी पत्नीला मदत करून जेव्हा मदत गोळा करायला निघतात तेव्हा मन थक्क होते. शिवाय गोळा केलेली मदत नक्की कोणाला खरोखर उपयुक्त आहे हे ते विचारपुर्वक ठरवतात.

गेली सुमारे २० ते २५ वर्षे (माझ्या माहितीप्रमाणे) सुमारे २ ते २ १/२ कोटींची मदत गोळा करून त्यांनी गावोगावी पोचवलेली आहे. यामधे अगदी अन्नधान्ये, औषधे, कपडे, स्वेटर, मेणबत्त्या, कडेपेट्या, पुस्तके, शालेय सामग्री, खेळणी तसेच मंदिरे व समाजोपयोगी संस्था यां टेबले, खुर्च्या, पंखे, देवांच्या तसबिरी अशा अनेकानेक वस्तूंचा समावेश आहे. कोणी जर पैशांच्या स्वरूपात देणगी दिली तर त्याला पावती देऊन ती योग्य त्या ठिकाणी रककम वापरली जाते.

नेहेमीच्या धकाधकीच्या आपल्या आयुष्यात आपण स्वत: तर अशाप्रकारे काम करू शकत नाही, तेव्हा मंचरकर गुरूजींच्या मार्फत समाजाशी असलेली बांधिलकी जपणारे अनेक लोक इथे आहेत. मंचरकर गुरुजींचे हे कार्य असेच अखंडपणे चालू रहावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.

मंचरकर गुरुजींचे वास्तव्य: बोरीवली पश्चिम. त्याच्याशी संपर्क करायचा असेल अथवा त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर इथे आपला प्रतिसाद नोंदवा.

माझे मन..

माझे मन..

मना सज्जना भक्तिपंथेची जावे.. तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे..

छूकर मेरे मनको किया तूने क्या ईशारा..

मन उधाण वाऱ्याचे.. गुज पावसाचे.. का होते बेभान कसे अडखळते...
मन उधाण वाऱ्याचे...

मेरे मन ये बता दे तू.. किस ओर चला है तू.. क्या पाया नही तूने.
क्या खोया नही तूने..

मनावर आधारित अशी अनेक गाणी आजपर्यंत रचली गेली, अजूनही रचली जातील. पण तरीही कोणाचे मन सहजासहजी ओळखणे मात्र तसे कठीणच. आपल्या मनाचा ठाव स्वत:चा स्वत:लाही कित्येकदा लागत नसतो. मग ईतरांच्या मनात डोकावणे तर महाकठीणच.

मी माझ्या सहवासात आलेल्या काही ब्यक्ति, आजूबाजूला घडणाऱ्या काही घटना यांविषयींच्या माझ्या भावना ह्या "माझे मन" या ब्लॉगच्या मार्फत आपणासमोर ठेवणार आहे. मात्र हे लक्षात ठेवा की हे मन एका साध्यासुध्या सर्वसामान्य स्त्रीचे मन आहे. कुणा थोर प्रतिभावंताचे नाही. त्यामुळे इथे आपली एक-एक कवाडं उघडताना ते वेळही लावेल व त्याच्या भावना तशा सुमार शब्दातच असतील, मात्र जे काही असेल ते अगदी मनापसून..