Thursday, July 14, 2016

पैशाची नाही... अजूनही प्रेमाची आहे दुनिया

पैशाची नाही... अजूनही प्रेमाची आहे दुनिया

रुपारेलला असताना आमच्या लेडीज रूमच्या जवळ कॅन्टीन होत तिथे बटाटावडा मिळायचा एकदम सॉलिड. तिथे पुष्कळदा वडा खाल्लाय.

वडे तळताना बेसनाचे काही थेंब गरम तेलात पडल्यावर ते तळून जो कुरकुरीत चुरा तयार होतो त्याकडे आम्हा मैत्रिणींची सतत नजर जायची. आम्ही त्या कॅन्टीनवाल्याला तगादा लावायचो कि आम्हाला तो चुरा दे थोडा म्हणून. सुरुवातीला एक दोन वेळा दिला त्याने पण नंतर मात्र तो अजिब्बात द्यायचा नाही.

"हे खाऊ नका ताई... घसा धरेल"

आज सौरभ सांगत होता कि आई अग काल मी आणि माझा मित्र रात्री उशिरा अभ्यास करून मग डोसेवाल्याकडे जाऊन डोसा खात होतो तेव्हा तिथे एक मुलगा आला होता.

 डोसेवल्याकडच पीठ संपलं होत. शेवटचा एक डोसा होणार होता. तो त्या डोसेवाल्याला स्वतः खायचा होता अस तो नुकताच म्हणाला होता. या मुलाने डोसा मागितल्यावर तो प्रथम नाहीये म्हणाला पण मग त्या मुलाच्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला "ठीक है शायद एक बन पायेगा । खाके जाना बेटा । "

असे अनुभव आले कि एवढं क्षणोक्षणी पैसा पैसा करणारी दुनिया अजून कशी चालली आहे या प्रश्नाचे उत्तर मिळते.


स्वाती छत्रे मायदेव

No comments:

Post a Comment