Wednesday, July 6, 2016

मुलाखतकार आणि निवेदक

"मुलाखतकार आणि निवेदक"

कित्येकदा मुलाखती रंगतात त्या मुलाखत घेणाऱ्याच्या कसबावर. संगीताचे कार्यक्रम अधिक बहारदार होतात ते निवेदकांनी केलेल्या रंजक निवेदनावर.

सुहासिनी मुळगावकर, वा. य. गाडगीळ, अशोक रानडे, सुरेश खरे, सुधीर गाडगीळ, मंगला खाडीलकर, विश्वास मेहेंदळे, राजू परुळेकर आणि हिंदीमध्ये माझ्या लक्षात राहिलेले तबस्सुम, सिमी गरेवाल, जब्बार पटेल आणि गुजराती मध्ये अदी माजबान, सबीरा मर्चंट अशी कित्येक मंडळी हे कार्यक्रम बहारदार करत आली आहेत.

या लोकांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भाषेवरच प्रभुत्व, आवाजावरची पकड आणि ज्या विषयाशी निगडित कार्यक्रम आहे त्या विषयाचा दांडगा अभ्यास.

ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याला एकदम comfortable करत त्याच्याकडून कार्यक्रमाला अपेक्षित असलेली माहिती काढून घेणे, मुलाखतीला जर चुकून वेगळे वळण लागले तर मुलाखतीची गाडी परत रुळावर आणणे या गोष्टी अतिशय कौशल्याने हे लोक हाताळतात.

संगीत कार्यक्रमामध्ये तर कित्येकदा मला या निवेदकांच्या छोट्या मोठ्या रंगतदार कथांनी खिळवून ठेवले आहे.

प्रतिभा आणि प्रतिमा, गजरा, शरदाचे चांदणे, शब्दांच्या पलीकडले, नक्षत्रांचे देणे,  संवाद, वाद संवाद, फुल खिले हैं गुलशन गुलशन, आवो मारी साथे हे विशेष लक्षात राहिलेले कार्यक्रम.

पु. लं. ची जब्बार पटेलांनी घेतलेली मुलाखत तर कित्येकदा पुनःपुन्हा पहिली आहे मी. राजू परुळेकर साठी म्हणून मुद्दाम सकाळची घाईची वेळ असली तरी संवाद कित्येकदा आवर्जून पाहिलाय.

या मंडळी म्हणजे दुधात साखर असल्याप्रमाणे कार्यक्रमात विरघळून त्याला सुमधुर, बहारदार करतात.

दुग्धशर्करा !


-स्वाती छत्रे-मायदेव




3 comments: